गंध ... आठवणीतला...

अनेकविध गंधछटा आपण रोजच अनुभवतो ... कधी मनाला भावणारे गंध कधी तिट्कारा आणनारे! कधी कधी गंध वाईट नसतो पण फारच गडद असतो... कधी कधी तो एखाद्या व्यक्तीशी वा जागेशी किंवा वस्तूशीही निगडीत असतो!

पहिला गंध कुठला घेतला असेल आपण कदाचित आईच्या कुशीचा... आठवणार नाही कदाचित तो... पण तरिही पहिला गंध विसरताही येत असेल का? अगदी लहानपणी, साधारणपणे दुसर्‍या वा तिसर्‍या इयत्तेत असताना, गावी किंवा मावशीकडे एकटंच जाताना मला त्याच गंधाची आठवण व्हायची... आई ऑफीसला असायची आणि तिच्या आठवणीने मन कळवळून यायचं. मग मी गुपचुप जाऊन तिच्या एखाद्या साडीला बिलगायचो...तिथे त्या गंधात मला आईच जणू भेटायची अन्‌ मग दोन अश्रू गाळून मी त्या साडीच्या रुपाने आईचा निरोप घ्यायचो... १५-२० दिवसांसाठी. हसू येतं आज, सारं कित्ती बालीश होतं!

बालपण आठवलं की आजोळ आठवतं... आजीला बिलगणं आठवतं ... माझ्या आणि आईच्या हातच्या छ्डीमध्ये, आजीचा हस्तक्षेप  आठवतो. माझ्या आजोळचं-गोव्यातलं आंब्याचं भाट आठवतं. अजुनही पहाटे पहाटे माडाच्या जळणार्‍या झावळ्यांचा गंध कुठेही आला की शिरोड्यातली आणि वेळ्ळीतली गंधांची मालीकाच सुरू होते- अगदी पोदेरच्या म्हणजे पाववाल्याच्या भोंपूपासून ते ताडी किंवा काजूच्या फेणीच्या मादक गंधा पर्यंत! आणि मग प्रत्येक गंधातून तिकडे घालवलेला एकेक क्षण सुस्साट नजरेसमोरुन जातो...

कधी कधी गंध मात्र नकोशा आठ्वणीही बांधून ठेवतो… धुराच्या आणि दुकानातल्या जळलेल्या कापडाच्या वासाने १९९४ च्या दंगलीच्या आठवणी अंगावर फिरुन एकदा शहारे आणतात. एस टी च्या लाल डब्यात शिरलं की कोकणातल्या घाट आणि त्यात लागलेली माझ्या पोटाची वाट आठवते आणि पोटात आधीच गोळा येतो.   

तसंच एखाद्या पदार्थाचाही वास एखाद्या अशा व्यक्तीशी जडून जातो, जी आता परत कधी भेटणार नसते!माणसांप्रमाणे, वस्तू प्रमाणे प्रत्येक जागेला,शहराला ,गावाला वा प्रदेशालादेखील आपला स्वत:चा एक गंध असतो… अनामिक… आणि तो प्रत्येकासाठी वेगळा असतो… जसं मी रत्नागिरी… कोकण म्हटलं तर मला एका हिरव्या गंधाचा भास होतो… गोवा म्हट्लं की तसाच पण थोडा वेगळाच मादक गंध डोके भारुन टाकतो… माझ्या बाबांच्या मूळ घरी जिथे मी फार थोडी वर्षेच होतो… आजही तिथे गेलो की एक कुबट पण गोड गंध मोठ्या आईच्या पदराची आठ्व करुन देतो! तिने भाजलेल्या सुक्या बोबलांना पळ्वताना, बसलेल्या चटक्यांची जाणीव पुन्हा जागृत करुन देतो.

असचं उलटपक्षीही होतं… वर्षातला शाळेचा पहिला दिवस आठवला की मृदगंधही त्या सोबतच येतो… अन्‌ हॉल मध्ये स्थिरावलेला ओलसर गंध वार्‍यासोबत शाळेत घेऊन जातो! कॉलेजचे मित्र आठवले की, बेलापूरच्या बिर्याणी सेंटरच्या बिर्याणीचा सुगंध भूक लग्गेच चाळवतो. एखाद्या लग्नाची पत्रिका पाहिली की अजूनही, ते गरमीतल्या लग्नातले, अत्तराचे उग्र दर्प भणभणतात आणि जेवणासाठी चाललेली सनईवरची संगीत खुर्ची आठवते!

गंध… कधी सुगंध तर कधी दुर्गंध असतो… पण प्रत्येक गंध असंख्य आठवणींचा अदृश्य साठाच!

तुमच्याही अशाच काही गंधाशी निगडीत आठवणी असतील मला नक्कीच सांगा…




या आणि अशाच अनेक  काव्याचा आस्वाद घेऊ शकता माझ्या ई-पुस्तकातून खालील संकेतस्थळाच्या माध्यमातून

#काव्यमेय #जीवगुंतताना #मराठी #मराठीकविता #अमेयदेसाई #प्रेमकविता #marathipoems #kavyamey #lovepoems #amazon #kindle #kindleedition #jeevguntataanaa


“ जीव गुंतताना… आयुष्यातल्या त्या दुर्मिळ क्षणांना गुंफते ज्यातुन आपण सारेच जातो. कधी त्यात गुंतत जातो कधी स्वत:ला व्यस्त करुन गुंता सोडवतो…
पण… गुंता सुटतो का असा??  ...
महाविद्यालयातील प्रेमाबद्दलची अल्लड स्वप्नं… प्रेम मिळाल्यानंतरचा अवखळ, सागरालाही थिटा पाडणारा आनंद… अन् विरहानंतर आभाळाला भिडणारा आक्रंद मग पुन्हा तेच प्रेम मिळवण्याचा जीवापाड केलेला यत्न… सार्‍या प्रेमाचा अर्थ उलगडत जातो तोही जीव गुंततानाच…”



टिप्पण्या